PrintSource

आभास रंगविता

Aabhas Rangavita

ग. दि. माडगूळकर

स्वप्‍नांतल्या फुलांचा होईल काय हार
आभाळ कोरतो का चित्रातला मिनार?
आली असे विरामा येथेच स्‍नेहगाथा
आभास रंगविता येणार काय हाता?

आभास ना सख्या हा, माझी विशुद्ध प्रीती
भवितव्य ठेविले मी सारे तुझ्याच हाती
का रे अशी निराशा तू ओतलीस माथा?
का साथ सोडिसी रे, सिद्धी समीप येता?

निष्कांचना निराशा ही एक जन्मजोड
माझी कुबेर-कन्ये तुज संगती विजोड
पाषाण होय तारा पृथ्वीतलास येता
आभास रंगविता येणार काय हाता?

माझ्या-तुझ्या जगाचा व्यवहार रे निराळा
स्वप्‍नेच स्वर्ग माझा, स्वप्‍नेच कल्पमाळा
स्वप्‍नां सजीवता दे, तू एक प्राणदाता
का साथ सोडिसी रे, सिद्धी समीप येता?