आधार जिवाला वाटावा
वय तर माझे सोळा सत्रा स्वभाव अगदी भोळा-भित्रा आधार जिवाला वाटावा असा कुणी मज भेटावा ! जो येतो तो भवती फिरतो सौंदर्याचे कौतुक करतो हा त्रास जयाने निपटावा असा कुणी मज भेटावा ! कुणी म्हणे मज गुलाब हसरा कुणी म्हणे मज गुणी शर्करा अभिमान ज्यापुढे फिकटावा असा कुणी मज भेटावा ! ब्रह्मचारी मज देतो टॉफी गृहस्थ पाजितो काळी कॉफी पण संसार जयासी थाटवा असा कुणी मज भेटावा ! एकोणिस वा वीस वयाचा मलाच राहील वचक जयाचा मन-पतंग त्याने काटावा असा कुणी मज भेटावा !