PrintSource

आमुची वसने दे श्रीहरी

Aamuchi Vasane De Shrihari

ग. दि. माडगूळकर

झोंबती अंगा जललहरी
आमुची वसने दे श्रीहरी !

पळे पळाली, गेली घटका
पुरे खेळ हा अवखळ, लटका
परत जाऊ दे घरी
आमुची वसने दे श्रीहरी !

जात आमुची अशी लाजरी
क्षणाक्षणाने पदर सावरी
सुवेश असला तरी
आमुची वसने दे श्रीहरी !

जळात बुडले देह तरी हे
उघडेपण मन विसरत नाही
लाज सले अंतरी
आमुची वसने दे श्रीहरी !

किती विनवावे, किती रडावे
असेच वाटे जळी बुडावे
तूच सुबुद्धी धरी
आमुची वसने दे श्रीहरी !