अर्धीच रात्र वेडी
अर्धीच रात्र वेडी, अर्धी पुरी शहाणी; भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी. फुललें पुन्हांपुन्हां हा केला गुन्हा जगाचा; ना जाहलें कुणाची पत्त्यांमधील राणी. येतां भरून आलें, जाता सरून गेलें, नाहीं हिशेब केले येतील शाप कानीं. आतां न सांध्यतारा करणार रे पहारा; फुलणार नाहिं आतां श्वासांत गूढ गाणीं. शापूं तरी कशाला या बेगडी जगाला; मी कागदी फुलांनीं भरतेंच फूलदाणी.