अशक्य तों तुह्मां नाही
अशक्य तों तुह्मां नाहीं नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥१॥ मागें काय जाणों स्वामीचे पवाडे । आतां कां रोकडे दावूं नये ॥२॥ थोर भाग्य आह्मी समर्थाचे कांसे । ह्मणवितों दास काय थोडें ॥३॥ तुका ह्मणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे सामर्थ्याचे ॥४॥ शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥५॥ ना भी ना भी भक्तराया । वेगीं पावलों सखया ॥६॥ दुरूनि येतां दिसे दृष्टी । धाकें दोष पळती सृष्टी ॥७॥ तुका देखोनि एकला । वैकुंठीहूनि हरि आला ॥८॥