बघा तरी हो कशी बांधिली
Bagha Tari Ho Kashi
अण्णा जोशी
बघा तरी हो कशी बांधिली जमवुन काडी काडी
अशी कुणाची असेल का हो, मजेदार झोपडी?
झोपडीस नाही दरवाजा आणि कडी-कोयंडा
बसायास हो कांबळ कुठली, उशाला नसे धोंडा
आनंदाने तरीही मिळते विश्रांती थोडी
अशी कुणाची असेल का हो मजेदार झोपडी?
राजमहाली जाउन तिथला पाहिला पसारा
इमले माड्या हवेलीतला वेगळाच तो वारा
दुरुन साजरे दिसे परंतु त्यात नसे गोडी
अशी कुणाची असेल का हो मजेदार झोपडी?
इथे जन्म घेई जो जो तो लावी जीवा जीव
आपसांत नांदते प्रीतीची ममतेची जाणीव
दिन सौख्याचा म्हणून या इथे विधाता उजाडी
अशी कुणाची असेल का हो मजेदार झोपडी?