देवा मला रोज एक
देवा मला रोज एक अपघात कर आणि तिच्या हातांनीच जखमा या भर ! कधीतरी कुठेतरी बसावी धडक कळ मला यावी तिला कळावे तडक घायाळाला मिळो एक घायाळ नजर ! अपघाती सोंग माझे वाटावे खरे तिला येता प्रेम मला वाटावे बरे दवा-दारूमध्ये कुठे असतो असर ! खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला विचारेल जेव्हा, "कुठे दुखते तुला?" जरा डावीकडे जरा पोटाच्या या वर ! टेकवता छातीवर डोके एकवार ठोका घेई झोका, उडे आभाळाच्या पार व्यथांचाच काय? पडे जगाचा विसर !