PrintSource

धुंदीत गाऊ मस्तीत राहू

Dhundit Gau Mastit Rahu

जगदीश खेबूडकर

धुंदीत गाऊ मस्तीत राहू
छेडित जाऊ आज प्रीत साजणा

थंडी गुलाबी हवा ही शराबी
छेडित जाऊ आज प्रीत साजणी

रूपेरी उन्हात धुके दाटलेले
दुधी चांदणे हे जणू गोठलेले
असा हात हाती, तू एक साथी
जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा

दंवाने भिजावी इथे झाडवेली
राणी फुलांची फुलांनीच न्हाली
ये ना जराशी, प्रिये बाहुपाशी
अशी मीलनाची आहे रीत साजणी

अशी हिरवळीची शाल पांघरावी
लाली फळांची गाली चढावी
हळूहळू वारा झंकारी तारा
आळवित प्रीतीचे संगीत साजणा

जळी यौवनाच्या डुले हा शिकारा
असा हा निवारा असा हा उबारा
अशा रम्य काली, नशा आज आली
एकान्‍त झाला जणू आज पाहुणा