PrintSource

दिंडी चालली चालली

Dindi Chalali Chalali

मधुकर आरकडे

दिंडी चालली चालली
विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला

टिळा वैष्णव हे ल्याले
गळा हार तुळशीमाळा
एकतारी देते साथ
टाळ-मृदुंगाच्या ताला
भागवताची पताका आलिंगीते गगनाला

गळा दाटला अभंग
घोष विठु रखुमाई
अनवाणी पाउलांना
कष्ट जाणवे न काही
चंद्रभागेच्या तिराची ओढ लागली मनाला

आले सुखाला भरते
चंद्र मोहरे भक्तीचा
दुजी भावना सरली
बोध जाहला ज्ञानाचा
भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला