दिसला ग बाई दिसला
ज्वानीच्या आगीची मशाल हाती, आले मी अवसेच्या भयाण राती
काजवा उडं, किरकिर किडं, रानात सुरांत गाती
दिलाचा दिलवर, जिवाचा जिवलग, कुठं दिसंना मला
ग बाई बाई, कुठं दिसंना मला
कुठं दिसंना, इथं दिसंना, तिथं दिसंना
शोधु कुठं, शोधु कुठं, शोधु कुठं?
दिसला ग बाई दिसला
मला बघून गालात हसला ग बाई हसला
गडी अंगानं उभा नि आडवा
त्याच्या रूपात गावरान गोडवा
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा
काळजामधी ठसला, ग बाई बाई काळजामधी ठसला
माझ्या राजाचा न्यारा डौल
डाव्या डोळ्याचा देतोय् कौल
लहरी पटका, मानेला झटका
भाला उरी घुसला, ग बाई बाई भाला उरी घुसला
अंगाअंगाची करते अदा
आग आगीवर झाली फिदा
उडंल भडका, चढंल धुंदी
जीव जीवा फसला, ग बाई बाई जीव जीवा फसला