दूरदेशी गेला बाबा
Dur Deshi Gela Baba
संदीप खरे
दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यांत, तरी घरी कुणी नाही !
कसा चिमणासा जीव, कसाबसा रमवला
चार भिंतींत धावुन दिसभर दमवला
"आता पुरे ! झोप सोन्या", कुणी म्हणतच नाही
नीज दाटली डोळ्यांत, तरी घरी कुणी नाही !
कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी?
कोणी बोलायाला नाही, कशी व्हावी कट्टी-बट्टी?
खेळ ठेवले मांडून परि खेळगडी नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !
दिसे खिडकीमधून जग सारे, दिशा दाही
दार उघडून परि तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परि मुठीमध्ये बोट नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !