दूर कुठे चंदनाचे बन
दूर कुठे चंदनाचे बन जळते तुला कळते ग मला कळते ! जाळ धावूनिया येता होरपळे अंग शीतलशा सुगंधाने निवे अंतरंग सुखावते कधी, कधी तळमळते तुला कळते ग मला कळते ! दैवदत्त शाप आहे चंदनाच्या बना जळल्यावाचून त्याचा उभा जन्म सुना दु:खभोग भोगताना मुक्ती मिळते तुला कळते ग मला कळते ! तुलामला चंदनाचा जन्म लाभला अशा चंदनपणाला जीव लोभला उगाळता जळताही दरवळते तुला कळते ग मला कळते !