एकटी एकटी घाबरलीस
Ekati Ekati Ghabarlis
संदीप खरे
छोटा मुलगा-
एकटी एकटी घाबरलीस ना? वाटलंच होतं आई
म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही !
आली होती जाम झोप.. गुडूप झालो असतो
भीती-बीती कसली.. थेट उद्याच उठलो असतो
मात्र वाटलं आपल्यापुरता विचार बरा नाही
मी आहे शूर.. माझी आई तशी नाही !
खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल..
घाबरून जाईल अंधारात रडत-बिडत बसेल..
म्हणून आलो.. ! आता काही घाबरायचं नाही
कुशीत घेऊन झोप मला म्हणजे काळजी नाही !
आई-
बरं झालं आलास सोन्या.. काही खोटं नाही
कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई !
विचारांनी सार्या कसं गलबलायला होतं
अंधार असतो फार मोठा.. पिल्लू असतं छोटं !
नाजुक नाजुक त्याचा जीव.. नाजुक नाजुक मन
कोवळी काच सोसेल कसे भविष्याचे घण?
लहान आहेस तोवर निदान कुशीत घेता येईल
मोठा होशील उडून जाशील तेव्हा काय होईल ?
कोण असशील? कुठे असशील करशील काय तेव्हा?
लहान होऊन कुशीमध्ये शिरशील काय तेव्हा
माझा आहेस अजून ये रे माझ्यापाशी रहा
अंगाईच्या कुशीमध्ये छान स्वप्न पहा
मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही
कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई !