PrintSource

गाव असा नि माणसं अशी

Gaav Asa Ni Manase Ashi

शान्‍ता शेळके

हल्या संबाळ हल्या
हे हे हल्या संबाळ हल्या !
गाव असा नि माणसं अशी
नातीगोती जडतंत कशी !

कुणी कुणाला जीव लावतंय्‌
पाडतंय्‌ कोणी फशी !
गाव असा नि माणसं अशी
नातीगोती जडतंत कशी !

रूप कुणाचं बिलोरी ऐना
आली भरात माशुक मैना
वय वसंत चैताचा महिना
तरुणपणानं केली तिची दैना
काच अब्रुची फुटून गेली
डाग लागला तिशी
गाव असा नि माणसं अशी
नातीगोती जडतंत कशी !

काय घडून गेलं मागं
कुठे रक्ताचं जुळलं धागं
नव्या अंगात झालं जागं
तेच नव्यानं वारसा सांगं
या गावाचा पोर कुणीसा
ताठ्यानं पिळतोय्‌ मिशी
गाव असा नि माणसं अशी
नातीगोती जडतंत कशी !

अशी उमेद घेऊन आला
नाही गुमान कुणाची त्याला
उंच आभाळयेवढा झाला
केलं ठेंगणं समद्या गावाला
वादळवारा पहाड झेली
छाती त्याची तशी
गाव असा नि माणसं अशी
नातीगोती जडतंत कशी !