PrintSource

गेला सोडुनी मजसी कान्हा

Gela Soduni Majasi Kanha

वसंत सबनीस

असा मी काय केला गुन्हा
गेला सोडुनी मजसी कान्हा

गोकुळात मी रंगून गेले
मनोमनी तर खूप नाचले
मुरलीचा मी सूर जाहले
अजून हृदयी त्याच खुणा

सांजसकाळी झाल्या भेटी
तेव्हापासून श्यामच ओठी
यमुनाकाठी मीच एकटी
सोसू किती मी यातना

तुझ्या प्रीतीची रीत निराळी
जीव लावुनी मनास जाळी
फसले रे मी राधा भोळी
सख्या मुकुंदा येई पुन्हा