गेले ते दिन गेले
वेगवेगळीं फुलें उमललीं रचुनी त्यांचे झेले एकमेकांवरी उधळले गेले ! ते दिन गेले !! कदंबतरूला बांधुन दोला उंच खालतीं झोले परस्परांनी दिले घेतले गेले ! ते दिन गेले !! हरित बिलोरी वेलबुटी वरिं- शीतरसांचे प्याले अन्योन्यांनीं किती झोकले गेले ! ते दिन गेले !! निर्मलभावें नव देखावे भरुनी दोन्ही डोळे तूं मी मिळुनी रोज पाहिले गेले ! ते दिन गेले !!