घाल घाल पिंगा वार्या
Ghal Ghal Pinga Varyaa
कृ. ब. निकुंब
घाल घाल पिंगा वार्या, माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात !
"सुखी आहे पोर," सांग आईच्या कानात-
"आई, भाऊसाठी परि मन खंतावतं !
विसरली का ग? - भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग मन आंचवलं.
फिरुन फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो !
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगूनीया करी कशी ग बेजार !
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे !
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय.. !"
आले भरून् डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !