PrintSource

गुलजार गुलछडी नटून मी

Guljar Gulachadi Natun Mi

जगदीश खेबूडकर

गुलजार गुलछडी नटून मी खडीखडी
नाचते मी घडीघडी करते नखरा नखरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भंवरा

सडसडीत बांधा उभा, सुरत गोरटी
भिरिभिरी शोधते कुणा नजर चोरटी
चोळी माझी चंदनी, तंगतंग पैठणी
चुणीवर चुणीचुणी उडवी पदरा पदरा

डाळिंब फुटे ओठात, गालामध्ये लाज
मी तरुणपणाचा जपून घेते अंदाज
छुमछुम बोले चाळ, नागमोडी माझी चाल
भवतीनं सूरताल मारती चकरा चकरा

बेभान नाचते रूपगुणाची राणी
ऊर होतो खालीवर बाई पारव्यावाणी
अडवुनी जागोजाग बळजोरी नगं नगं
जाते बाई लगबग सख्याच्या नगरा नगरा