PrintSource

जात्यामधले दाणे रडती

Jatyamadhale Dane Radati

मधुकर जोशी

जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती
कळे न त्यांना मरण उद्याचे भाळी या अंती

भविष्य कळते काय कुणाला
फूल आजचे धूळ उद्याला
निर्माल्याला कधी घेतसे कोणी का हाती

जन्म घेउनी मृत्यू येतो
मृत्यूसंगे जीव जन्मतो
युगायुगांचे चक्रसारखे फिरते हे भवती

का दुसर्‍याला उगा हसावे
तेच आपुल्या नशिबी यावे
चुकेल का कधी जे लिहिलेले कर्माने अंती