जें का रंजलेंगांजले
जें का रंजलेंगांजले । त्यासि ह्मणे जो आपुलें ॥१॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनांचें चित्त ॥३॥ ज्यासि अपंगिता नाहीं । त्यासि धरी जो हृदयीं ॥४॥ दया करणें जें पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥५॥ तुका ह्मणे सांगू किती । तोचि भगवंताच्या मूर्ती ॥६॥