PrintSource

का उगा पतंगा जळसी

Ka Uga Patanga Jalasi

शांताराम नांदगांवकर

मी तर रमते प्रभुचरणांसी, होउनी त्यांची दासी
का उगा पतंगा जळसी?

मला धुंदीचा गंध न कळतो
जीव प्रभुस्तव का तळमळतो?
तू तर वेड्या प्रीती भुकेला, मी परि पावन तुळशी
का उगा पतंगा जळसी?

एक कळे मज, सदा जागणे
नाथांच्या कीर्तनात रमणे
माझी मिणमिण नकळत मिळते त्यांच्या दिव्य प्रकाशी
का उगा पतंगा जळसी?

थांबव नाजूक संथ जाळणे
मजसाठी तव जीवास छळणे
पहा लोचने निजती पाखरा, खुपते शल्य उराशी
का उगा पतंगा जळसी?