PrintSource

खिनभर जवळी बसा

Khinbhar Javali Basa

म. पां. भावे

गोड बोलुनी माझ्यासंगं हसा
अन्‌ दाजी तुम्ही खिनभर जवळी बसा

माझ्या दिलाचं तुम्ही मनचोर
आनि मनाचं लई दिलदार
तुमच्या पिरतीला येऊ द्या पूर
गडे तुमच्यावरी माझा भरवसा
अन्‌ तात्या जरा खिनभर जवळी बसा

तुमच्या डोळ्यांत मला गवसलं
माज्या पिरतीचं येड तुम्हा लागलं
दोन जिवांचं नातंही जमलं
लटकं भांडण करुनी बाई हसा
अन्‌ मामा जरा खिनभर जवळी बसा

राया मनात मोगरा फुलला
तुमची जन्माची संगत मजला
बघा खुशीनं गातोय्‌ ह्यो गळा
ताल-सुरांचा मेळ बसला कसा
अन्‌ आबा जरा खिनभर जवळी बसा