PrintSource

कुठे शोधिसी रामेश्वर

Kuthe Shodhisi Rameshwar

मंगेश पाडगांवकर

कुठे शोधिसी रामेश्वर अन्‌ कुठे शोधिसी काशी
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी

झाड फुलांनी आले बहरुन
तू न पाहिले डोळे उघडुन
वर्षाकाळी पाऊसधारा
तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा
लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेउन नांगर हाती
पिकविलेस मातीतुन मोती
हाय अभाग्या भगवे नेसुन घर संन्यासुन जाशी

देव बोलतो बाळमुखातुन
देव डोलतो उंच पिकांतुन
कधी होउनी देव भिकारी
अन्‍नासाठी आर्त पुकारी
अवतीभवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी