मनातल्या मनात मी
मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो ! तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो ! असेच रोज नाहुनी लपेट ऊन्ह कोवळे, असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे; तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो ! अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले, असेच सांग लाजुनी कळ्यांस गुज आपुले; तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो ! तसा न राहिला अता उदास एकटेपणा; तुझीच रूपपल्लवी जिथे तिथे करी खुणा; पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो !