PrintSource

नदीकिनारी नदीकिनारी (२)

Nadikinari Nadikinari Ga (2)

मो. ग. रांगणेकर

नदीकिनारी नदीकिनारी नदीकिनारी, ग !

इथेच घडली भेट आपुली
नवप्रेमाची पहिलीवहिली
हासत होत्या कुजबुजुनी या अवखळ लहरी, ग !

तुझेच कुरळे केस मोकळे
सदा तयाशी करुनी चाळे
वहात होता लबाड वारा पदरामधुनी, ग !

निळ्या नभांतुनी येउनि खाली
ऐकत होती रात्र रुपेरी
निर्मळशी अपुल्या प्रीतीची गोड कहाणी, ग !

निवांत झाले आज चहुकडे
उभारले प्रीतीचे थडगे
रात्र ढाळिते रोज प्रभाती अश्रुफुले वरती, ग !