PrintSource

नका विचारू देव कसा

Naka Vicharu Dev Kasa

रा. ना. पवार

नका विचारू देव कसा
देव असे हो भाव तसा

सगूण कुणी म्हणती देवाला
कोणी म्हणती निर्गुण त्याला
विश्वरूप त्या परमेशाचा चराचराचर असे ठसा

रंग फुलांचा दिसे लोचना
मूर्ति प्रभुची तोषवी नयना
दिसे कधी का कुणास सांगा गंध फुलाचा मोहकसा

दर्पणास का रूप स्वत:चे
असती का आकार जलाचे
साक्षात्कार जसा तो दाखवी दिसेल त्याला प्रभु तसा