PrintSource

नवलाख तळपती दीप विजेचे

Navlakh Talapati Deep

कुसुमाग्रज

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरलीं तारकादळें जणू नगरांत
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हां
त्या माजघरांतिल मन्‍द दिव्याची वात !

वार्‍यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकतां उसासे, चरणचाल हो मन्‍द
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हां
त्या परसामधला एकच तो निशिगन्‍ध !

हेलावे भंवतीं सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान्‌ इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हां
तो नदीकिनारा आणि भंगला घाट !

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणतां नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हां
तूं आर्त मला जो ऐकविलास अभंग !