निरांजन पडले तबकांत
Niranjan Padale Tabakat
बाबुराव गोखले
निरांजन पडले तबकांत
बाळ तर गेला समरांत
क्षणाआधिं तर तेवत होती
पूजेमधली प्रशांत ज्योती
दृष्ट कुणाची लागून कां ती
विझली निमिषांत
ओवाळुनही झाली नव्हती
तोंच उधळली मंगल आरती
कां पडली बाळाची आहुती
संगर-यज्ञांत
रागरागिणी आळवुन झाली
आयुष्याची कविता सरली
दुर्दैवाने माता बसली
भैरवी आळवीत
परक्यांना करण्यास्तव तर्पण
फूल पोटिचे केले अर्पण
निर्माल्याला तुडवूं नका पण
सोडा गंगेत
आतां मज द्या शव तरि आणुनी
झाकिन ते मी ऊर फाडुनी
भडाग्नि शोकानले देउनी
निजेन सरणांत