पंढरपुरीचा निळा
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा । विठा देखियेला डोळां बाईये वो ॥१॥ वेधलें वो मन तयाचिया गुणीं । क्षणभर न विसंबे विठ्ठलरुक्मिणी ॥२॥ पौर्णिमिचें चांदिणें क्षणाक्षणां होय उणें । तैसें माझें जिणें एका विठ्ठलेंवीण ॥३॥ बाप रखुमादेविवरू विठ्ठलुचि पुरें । चित्त चैतन्य मुरे बांईये वो ॥४॥