पाण्या निघाली सुंदरी
पाण्या निघाली सुंदरी । मन ठेवि दो घागरीं । चाले मोकळ्या पदरीं । परी लक्ष तेथें ॥१॥ वावडी उडाली अंबरीं । हातीं धरोनियां दोरी । दिसे दुरिच्या दुरी । परी लक्ष तेथें ॥२॥ चोर चोरी करी । ठेवी वनांतरीं । वर्ततसे चराचरीं । परी लक्ष तेथें ॥३॥ व्यभिचारिणी नारी । घरा श्रम करी । परपुरुष जिव्हारीं । परी लक्ष तेथें ॥४॥ तुका ह्मणे असों भलतिये व्यापारीं । लक्ष सर्वेश्वरीं । चुकों नेदी ॥५॥