तापल्या आहेत तारा
तापल्या आहेत तारा तोंवरी गाऊन घे स्वप्न आहे लोचनीं हें तोंवरी पाहून घे रे फुलांचा बाण आहे, अमृताची वेदना नी सुखाच्या आंत आहे शापणारी यातना त्राण आहे तोंवरी सप्राण हें साहून घे आग आहे लागलेली अंतरींच्या मोहळा आणि आकाशांत आहे आसवांचा सोहळा चालल्या आहेत धारा तोंवरी न्हाऊन घे वादळीं अंधारल्या पाण्यांतुनी तेजाळुनी कामिनी आवेगवेडी येत आहे दामिनी जाग आहे तोंवरी रे दीप हा लावून घे