तुझ्या एका हाकेसाठी
तुझ्या एका हाकेसाठी । किती बघावी रे वाट । माझी अधीरता मोठी । तुझे मौनही अफाट ॥ तुझ्या एका हाकेसाठी । कान जिवाचे करीते । सारी कपाटे शब्दांची । रोज रोज धुंडाळिते ॥ तुझ्या एका हाकेसाठी । उभी कधीची दारात । तुझी चाहूलही नाही । होते माझीच वरात ॥ तुझ्या एका हाकेसाठी । हाक मीच का घालावी । सात सुरांची आरास । मीच मांडून मोडावी ॥ आले दिशा ओलांडून । दिली सोडून रहाटी । दंगा दारात हा माझा । तुझ्या एका हाकेसाठी ॥