तुझ्या नभाला गडे किनारे
तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही ! तिथेच जाऊन वेच तारे अजून काही ! जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा, खुली व्यथांची सताड दारे अजून काही ! तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू घरात येतात वाटमारे अजून काही ! गडे मला सांग तूच माझीतुझी वदंता विचारते गाव हे बिचारे अजून काही ! करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही ! विझून माझी चिता युगे लोटली तरीही विझायचे राहिले निखारे अजून काही !