उपवर झाली लेक लाडकी
Upavar Jhali Lek Ladaki
ग. दि. माडगूळकर
उपवर झाली लेक लाडकी लग्नाला आली
स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदानी केली
सुवर्णस्तंभावरी बसविली फिरती मत्स्याकृती
1तेलामाजी बिंब पाहुनी छेदिल हो कोण ती?
छेदिल त्याला विवाहमाला घालिल पांचाली
स्वयंवराचा भरला मंडप, गर्दी तरी ती किती !
देशदेशचे जमले होते रणशार्दूल नृपती
भावासंगे तेजस्विनी ती सभागृही आली
रतीहुनी ती अतीव सुंदर सुभगा गुणशालिनी
मऊ रेशमी अलकभार तर ख्यात स्वरूपाहुनी
धनुर्धरांच्या मनीची आशा आव्हाना टपली
हत्तीवरुनी जणू चमकली समूर्त सौदामिनी
सूतपुत्र अन् कर्ण राहिला उभा त्वरे उठुनी
हीन कुळीचा म्हणून तयाला संधी नच दिधली
इतुके होते तरीही कृष्णा कुणातरी न्याहळी
ब्राह्मणवेषे तोच निरखिला अर्जुन नृपमंडळी
जीवाशिवासम त्या दोघांची दृष्टभेट झाली
त्या नजरेने स्फुरले बाहू वीर सिद्ध झाला
अचुक लावुनी बाण तयाने मत्स्यभेद केला
धनंजयाच्या गळा धन्य ती वरमाला पडली