उतरली सांज ही धरेवरी
उतरली सांज ही धरेवरी मी उभी घेउनी कलश करी सांज मनी दरवळे मनोहर गात तरंगत जल लहरीवर करीत व्याकुल माझे अंतर मज साद घालतो परोपरी उरे शांतता या पथी निर्जन प्रेमनदीला भरती येऊन उठती लहरी चंचल उसळून ही वळती पाउले तटावरी येईन का मी नाही परतुन? तिथेच कोणा राहिन बिलगुन? वीणा वाजवी कुणीतरी मोहन तो नाद अनोखा घुमे उरी