PrintSource

आई होऊन चुकले का मी

Aai Houn Chukale Ka Mi

पी. सावळाराम

आई होऊन चुकले का मी?
पोर पोटची देत न ओळख, आईपणाला मुकले का मी?

नऊ मासाचा, पहिलेपणीचा, गर्भभारही मीच वाहिला
पदराआडून अमृत पान्हा या मायेने जिला पाजिला
तळहाताच्या फोडापरी हो या लेकीला जपले का मी?

पती विरहाचे दु:ख विसरूनि शोधित आले तुजला पोरी
'आई' म्हण तू या आईला, सांगायाची झाली चोरी
अभागिनीचे सुख हे इवले तुलाही देवा खुपले का?