PrintSource

झुळूक आणखी एक

Jhuluk Aanakhi Ek

वा. रा. कांत

झुळूक आणखी एक- आणखी एक पान गळलें !

पानीं फुलला सुमनिं बहरला
माझ्या अंगणिं जरि तरू वठला
शुष्क डहाळिंत अंग मोडिती कोंब नवे इवले !
- आणखी एक पान गळलें !

चंद्रकोर अंगांगीं भरली
दिनदिन कणकण उजळुन खिरली
परि अवसेच्या प्रभात-ओटिंत सूर्यबिंब भरले !
- आणखी एक पान गळलें !

खुशाल गळतां, गळा दळांनो
हसत सरा माझिया क्षणांनो
बघे क्षणांच्या पानझडिंत मी अक्षयपण उमले !
- आणखी एक पान गळलें !