कुठे ठेऊ ही ठेव सुखाची
कुठे ठेऊ ही ठेव सुखाची चंद्रकलेसम खुलुनी आली मेंदी माझ्या नखानखाची ! सुखासवांनी भरले डोळे त्यात सख्याचे रूपच तरळे अंगाअंगावर आली धुंदी प्रेमरसाची, सहवासाची ! हळुच तयांनी धरिता बोटे सुखास झाले गगन धाकटे बधीर झाली अवघी बोटे, मूठ उघडली नवलाखाची ! मनास आता ठाव कोठला? तिथे उद्याचा गाव थाटला तनामनांतरी मावेना ही अमोल दौलत आनंदाची !